दारूच्या नशेत अनेक भीषण अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मध्यपान करून गाडी चालवण्यास सक्त मनाई असूनही असे प्रकार घडत आहेत. दरम्यान, अशाच एका अपघाताची घटना उघडकीस आली आहे.
पालघर जिल्ह्यातल्या वसईत एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे. वसईच्या फादरवाडी सिग्नलवर आज 4 वाजता ही घटना घडली आहे, या अपघातामध्ये एक महिला जखमी झाली आहे, तर इतर वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार कारचालक हा वसईमध्ये असलेल्या विद्याविकासनी शाळेचा मुख्याध्यापक असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले असून, मारिया दासो असे दारूच्या नशेत अपघात करणाऱ्या या मुख्यध्यापकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टोयोटा कंपनीची कार हा मुख्याध्यापक चालवत होता, त्याने भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं. त्याच्या गाडीमध्ये बियरच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत.
वसईच्या फादरवाडी सिग्नलवर या कार चालकाने प्रथम एका रिक्षाचालकाला उडविले, त्यानंतर एका वडापावच्या हातगाडीला उडविले, त्याठिकाणी वडापाव खात असलेल्या महिलेच्या अंगावर गरम तेल पडल्याने ती या घटनेत जखमी झाली आहे. हा कारचालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानंतर त्याने एकामागून एक आणखी काही वाहनांना धडक दिली.
त्यानंतर घटनास्थळावरील अन्य काही वाहनचालकांनी याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वेळीच येऊन या मुख्यध्यापकाला ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. त्याची गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. मुख्याध्यापक असूनही हा व्यक्ती दारूच्या नशेत गाडी चालवत होता. यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत होत आहे. पोलिसांनी याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.