छावा बघायला गेलेले दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात ! नेमकं काय  घडलं ?
छावा बघायला गेलेले दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात ! नेमकं काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
छावा चित्रपटामुळे मोक्का अंतर्गत कारवाई झालेले दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. संबंधित दोन्ही गुन्हेगार छावा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात आले होते. मात्र खबऱ्याकडून याची टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी थेअटरमध्ये सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही  घटना पुणे इथे घडली आहे. 

धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय 22) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय 23) अशी अटक केलेल्या सराईतांची नावं आहेत. दोघेही दिघी येथील शिव कॉलनीचे रहिवासी आहेत. यापूर्वी दोन्ही आरोपींवर मकोका, एनडीपीएस कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मागील अनेक दिवसांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. मात्र त्यांना छावा चित्रपटाचा मोह आवरता आला नाही.

21 फेब्रुवारी रोजी कुख्यात गुंड धर्मेनसिग आणि बादशाह सिंग दोघंही चित्रपट पाहण्यासाठी हडपसरमधील वैभव टॉकीज परिसरात आले होते. त्यांनी तिकीट काढून चित्रपटगृहात शिरले. पण त्यांना छावा चित्रपटाचा आनंद घेता आला नाही. हे दोघंही छावा चित्रपट पाहायला येणार असल्याची गुप्त माहिती आधीच पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे गुन्हे शाखेच्या यूनिट सहा ने वैभव टॉकीजमध्ये सापळा रचला. कोम्बिंग ऑपरेशन करत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या.

दोघांना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेनं दोघांना दिघी पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. दोन्ही सराईतांवर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), ‘एनडीपीएस’ कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group