राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून राज्यातील घडामोडींना वेग आला असून राज्यातील कामांना देखील वेग आला आहे. महायुती सरकार जोरदार कामाला लागले आहे. दरम्यान आता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि. ३ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत मुंबईत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
विधानभवन, मुंबई येथे झालेल्या विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर दि. १३ मार्च २०२५ रोजी होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मंत्री गिरीष महाजन, शंभुराज देसाई, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड.अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ.नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.