नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : इयत्ता दहावीच्या परीक्षेला उद्या (दि. २१) पासून नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी मराठीसह इतर विविध भाषा विषयांची परिक्षा होणार आहे. नाशिक विभागातून २ लाख २ हजार ६२७ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत.
दरम्यान, इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असताना त्यापाठोपाठ दहावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. १७ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत विविध विषयांच्या लेखी पेपरला विद्यार्थी समोरे जातील. इयत्ता बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळ, शिक्षण विभागाने नियोजन आखले आहे. विविध संवेदनशील केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यासह भरारी पथकांची करडी नजर या परीक्षेवर असणार आहे. परीक्षा आयोजनासंदर्भात शिक्षण मंडळाची संपूर्ण प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली आहे. तसेच शाळांकडून आसन व्यवस्थादेखील जाहीर केली जाते आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेला सामोरे जाण्यासाठी उत्साह बघायला मिळतो आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षावेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे. सकाळ सत्रातील परीक्षेत सकाळी साडेदहाला पहिला गजर वाजेल व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. १० वाजून ५० मिनिटांनी उत्तरपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. अकराला प्रश्नपत्रिका वाटप केले जाईल. विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा मिनिटांचा वेळ मिळणार असल्याने सर्व प्रश्न सोडविण्याची संधी उपलब्ध असणार आहे.
नाशिक विभागाची स्थिती अशी-
जिल्हा निहाय प्रविष्ठ विद्यार्थी
नाशिक - ९४ हजार ५२८ ,
जळगाव - ५७ हजार ५०३,
धुळे - २८ हजार ८०४,
नंदुरबार - २१ हजार ७९२,
एकूण - २ लाख २ हजार ६२७