राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. फडणवीस सरकार जोरदार कामाला लागले असून मंत्र्यांसोबत अनेकी महत्वाच्या बैठकी घेत असून राज्यातील अनेक निर्णय मार्गी लावले जात आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री फडणवीस आपल्याच मंत्र्यांवर संतापले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी आपल्याच मंत्र्यांवर संतापले. मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वी बैठकीचा अजेंडा बाहेर येत असल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. त्यांनी या बाबत आपल्या सहकारी मंत्र्यांना जाहीरपणे कानपिचक्या दिल्या. मुख्यमंत्री येथेच थांबले नाही त्यांनी गुप्ततेच्या शपथेची आठवणही मंत्र्यांना करुन दिली. त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही तर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळ बैठक होण्याचा अजेंडा छापणे चुकीचे आहे. बैठक होण्यापूर्वी काही लोक अजेंडा छापत आहे. याबाबत मी मंत्र्यांनाही सांगितले आहे. मंत्र्यांनी आपल्या कार्यालयांना बैठकीपूर्वी अजेंडा न छापण्याचे सांगितले पाहिजे. अन्यथा मला कारवाई करावी लागले. हा अजेंडा गुप्त असतो. त्या गुप्ततेची शपथ आपण घेतली आहे. तसेत माध्यमांनी सुद्धा आपल्या खपासाठी आणि टीआरपीसाठी नियम मोडू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.