विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाला गळती लागली असून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दरम्यान, मागच्या आठवड्यात रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आज सुद्धा रत्नागिरी-दापोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे पाच नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते वेगळा गट स्थापन करणार असून जिल्हा प्रशासनाला त्यांनी तसं पत्र दिलं आहे.
येत्या 20 फेब्रुवारीला जितेंद्र जनावळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतील. जितेंद्र जनावळे हे विलेपार्ल्यातील ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख होते. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या नाराजीची चर्चा होती. पक्ष सोडताना ‘साहेब मला माफ करा’ असं पत्र त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. आगमी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामुळे ठाकरे गटासमोर आव्हान निर्माण होणार आहे.