मेकअप म्हंटल कि स्त्रिया, हेच आपल्या डोळ्यासमोर येते. मेकअप करणे स्त्रियाना सर्वात जास्त आवडते. पण एका देशात चक्क एका पोलीस अकादमीमध्ये पुरुष पोलीस कॅडेट्ससाठी मेकअप कोर्स सुरू करण्यात आला आहे.
जपानमधील फुकुशिमा येथील एका पोलीस अकादमीमध्ये पुरुष पोलीस कॅडेट्ससाठी मेकअप कोर्स सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत या अकादमीमध्ये मेक-अप कोर्ससाठी 60 पोलीस कॅडेट्सचा समावेश करण्यात आला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हा मेकअप कोर्स या वर्षी जानेवारीमध्येच सुरू झाला होता. या कोर्समध्ये, मूलभूत मेकअप तंत्रे शिकवली जात आहेत, ज्यामध्ये आयब्रो पेन्सिल वापरणे, चेहरा हायड्रेट ठेवणे, प्राइमर लावणे, आयब्रो ट्रिमिंग आणि कॅडेट्सचे केस स्टाईल करणे यासारखे सौंदर्य कौशल्ये समाविष्ट आहेत.
या कोर्समध्ये जपानचा प्रसिद्ध ब्युटी ब्रँड शिसेडोचाही समावेश करण्यात आला आहे. पोलीस अकादमीचे उपप्राचार्य ताकेशी सुगिउरा म्हणतात की, पोलीस अधिकारी अनेकदा वेगवेगळ्या लोकांना भेटतात, म्हणून नीटनेटके आणि व्यावसायिक दिसणे महत्त्वाचे आहे. समाजाचा सदस्य आणि भावी पोलीस अधिकारी म्हणून सुंदर दिसले पाहिजे. मेकअप कोर्स केलेल्या एका पुरूष कॅडेटने सांगितले, 'मी यापूर्वी कधीही मेकअप केलेला नाही. मला वाटते की, पोलीस अधिकारी असणे म्हणजे लोकांच्या नजरेत असणे, म्हणून मी कामावर जाण्यापूर्वी मी चांगले दिसण्याची खात्री करतो.’
या विचित्र प्रशिक्षणाचा उद्देश पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक व्यावसायिक, आकर्षक आणि नीटनेटके दिसावे हा आहे. जपानच्या पोलीस अकादमीने सुरू केलेले हे मेकअप प्रशिक्षण केवळ पोलीस अधिकाऱ्यांचा व्यावसायिक लूक सुधारण्याचा एक अनोखा मार्ग नाही, तर समाजातील पोलिसांची प्रतिमा सकारात्मकरित्या बदलण्याचा प्रयत्न देखील असू शकतो. वेगवेगळ्या अकादमींमध्ये हा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, ज्यामध्ये काही लोकांनी त्याची खिल्ली उडवली आहे, तर काहींनी त्याचे कौतुकही केले आहे.