मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून संपून महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणाला दोन महिने उलटूनही मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांचा तपास संथ असून आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाई झालेली नाही.या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान , संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे गावकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. आज दुसऱ्या दिवशी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर मस्साजोग येथील आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित देण्यात आली आहे. गावकऱ्यांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
धनंजय देशमुख यांनी मागील २४ तासांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. आज बुधवारी दुपारी भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग इथं जाऊन आंदोलन स्थळी भेट दिली. गावकऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री यांना गावकऱ्यांच्या मागण्या संदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी सहमतीने आंदोलन तुर्तास स्थगिती करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या प्रकरणी सीआयडी आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे. रात्रंदिवस आम्ही आरोपीचा शोध घेत आहे. गोपनिय माहितीच्या आधारेही तपास सुरू आहे. सीआयडीकडे तपास असल्यामुळे सहआरोपी करण्याबाबत पाठपुरावा केला जाणार आहे, अशी ग्वाही बीड पोलिसांनी आंदोलनस्थळी दिली.
आमच्या मागण्याबाबत आता योग्य निर्णय व्हावा, ही आमची पहिल्यापासून मागणी आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर यापुढे पुढाऱ्यांना मस्साजोग गावात बंदी करण्याचा इशारा, गावकऱ्यांनी यावेळी दिला.
गावाने केलेल्या आंदोलनात मी आंदोलक म्हणून सहभागी झालो होतो. माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आरोपी अजूनही मोकाट आहे. त्याला तातडीने अटक झाली पाहिजे. इथून पुढे आंदोलनाचे दिशा ही गावकरी ठरवतील, असं यावेळी धनंजय देशमुख म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असं जाहीर केलं आहे, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.