राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यसरकरडून वेळोवेळी हिताचे निर्णय घेतले जातात. दरम्याना आता पुन्हा एकदा राज्यसरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि मोठी घोषणा करण्यात आली आहे.
राज्यात जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीची मंजुरी देण्यात आली आहे. मंगळवारी (25 फेब्रुवारी) घोषित करण्यात आलेल्या निर्णयानुसार नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील 23,065 शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 25 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी प्रति हेक्टरी 47 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही मदत 5 हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही. तरीही अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या निकषांपेक्षा कमी मदत मिळत असल्याची तक्रार केली आहे, ज्यामुळे अनेकांना योग्य भरपाई मिळत नाही आणि काही शेतकरी या मदतीपासून वंचित राहतात.
जून ते सप्टेंबर 2024 मध्ये राज्यात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतीच्या जमिनीही वाहून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तातडीने मदतीची मागणी होत असताना अखेर राज्य सरकारने मदतीचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील 4 प्रमुख विभागांतील 19 जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
नाशिक विभाग - जळगाव
पुणे विभाग - पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
नागपूर विभाग - गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर
अमरावती विभाग - अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम
छत्रपती संभाजीनगर विभाग- परभणी, लातूर, हिंगोली, धाराशीव, नांदेड