राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून चोरी, दरोडा तसेच हत्या यांसारखे गंभीर गुन्हे देखील सर्रास पणे घडत आहेत. दरम्यान, अशुच एक धक्कादायक घटना घडली उघडकीस आली आहे.
पुण्याच्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अमानुष घटना उघडकीस आली आहे. ये रविवारी मध्यरात्री हे कुटुंब घरात झोपलं असताना, काही दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकला. पण घरातील लोकांना जाग आल्यानंतर या दरोड्याचं रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झालं. अज्ञात दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार करत कुटुंबातील दोघांना रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. यावेळी घरातील फरशी रक्ताने माखली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड परिसरात घडली आहे. येथील बहुळ ग्रामपंचायतच्या हद्दीतील फुलसुंदर वस्ती आहे. या वस्तीवर अशोक वाडेकर आपल्या कुटुंबासह राहतात. रविवारी रात्री घरातील सर्वजण जेवन करून झोपी गेले होते. मध्यरात्री अचानक काही अज्ञात लोक घरात घुसले. त्याच्या हातात तीक्ष्ण हत्यारं होती.
आरोपींनी वाडेकर यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी वाडेकरांनी त्यांना विरोध केला. यावेळी संतापलेल्या दरोडेखोरांनी कसलाही विचार न करता कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अशोक जयराम वाडेकर आणि उज्वला अशोक वाडेकर दोघंही गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरोड्यासह खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दोन्ही जखमींवर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मध्यरात्री अचानक घरात सशस्त्र दरोडा टाकून अशाप्रकारे हल्ला केल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.