गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शि शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे. गुजरातच्या सरिग्राम येथून दगड खाणीतून पालघर पोलिसांकडून अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची कार बाहेर काढण्यात आली आहे. अपहरण आणि हत्या प्रकरणात अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडीच मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच काही साथीदारांसोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक धोडी हे मुंबईतून घरी परतत असताना त्यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठला. गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकलली. दरम्यान , तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला.
अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी यांनी कौटुंबिक वाद आणि इतर वादातून आपल्या सहकारी आरोपींसह अशोक धोडी यांचं अपहरण केले. त्यानंतर त्यांची हत्या केल्याचे बोललं जात आहे. आरोपी अविनाश धोडी हा दारू तस्करीचा अवैध धंदा करायचा. या धंद्यात अशोक धोडी हे अडचण ठरत असल्याने त्याने अशोक यांचं अपहरण केले. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अविनाश धोडीसह इतर तीन आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहेत. त्यांचाही लवकरच शोध घेऊन अटक केलं जाईल, असा विश्वास पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी कुटुंबाला दिला.