हरमल येथे स्थानिक युवकाची हत्या झाली 'त्या' शॅकचा परवाना रद्द , शॅक मालकाला 25 लाखांचा ठोठावला दंड ; नेमकं प्रकरण काय?
हरमल येथे स्थानिक युवकाची हत्या झाली 'त्या' शॅकचा परवाना रद्द , शॅक मालकाला 25 लाखांचा ठोठावला दंड ; नेमकं प्रकरण काय?
img
Dipali Ghadwaje
हरमल किनार्‍यावर अमर बांदेकर या युवकाची शॅकच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या आक्रमणात हत्या झाल्यानंतर संबंधित ‘शॅक’ मूळ मालकाने भाड्याने परप्रांतियाला चालवायला दिल्याचे उघड झाले आहे. यासाठी पर्यटन खात्याने संबंधित ‘शॅक’ची अनुज्ञप्ती रहित केली आहे आणि ‘शॅक’चा मूळ मालक मान्युअल फर्नांडिस याला २५ लाख रुपये दंड ठोठावण्यासमवेतच त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त केली आहे. 

त्याचप्रमाणे पुढील ७ दिवसांत संबंधित ‘शॅक’ पाडण्याचा आदेश दिला आहे. पर्यटन खात्याने ‘शॅक’चे मालक मान्युअल फर्नांडिस याला काळ्या सूचीत टाकले आहे. भविष्यात मान्युअल फर्नांडिस याला कोणत्याही ‘शॅक’ वाटप प्रक्रियेत सहभागी होण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.

फर्नांडिस यांनी ‘शॅक’ धोरणाचे कलम २० चे उल्लंघन करून भाड्याने दिला आहे, अशी माहिती मांद्रे पोलिसांनी २७ जानेवारी या दिवशी पर्यटन खात्याला सादर केलेल्या अहवालात दिली आहे. पर्यटन खात्याने या पार्श्‍वभूमीवर ‘शॅक’ धोरणाचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई आरंभली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार हरमल येथे अनेक गोमंतकियांनी त्यांच्या नावावर ‘शॅक’ घेऊन ते हिमाचल प्रदेश किंवा अन्य राज्यांतील लोकांना भाड्याने दिलेले आहेत. हरमल येथील घटनेनंतर विरोधी पक्षांनी यावर आवाज उठवला आहे.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘शॅक’चे उपकंत्राट परप्रांतीय व्यक्तीला दिल्याचे आढळल्यास ते खपवून घेणार नाही. ‘शॅक’चे धोरण हे ‘शॅक’ व्यावसायिकांशी चर्चा करूनच सिद्ध केले होते. ‘शॅक’ व्यवसाय हा गोमंतकियांकडेच रहावा हा मूळ हेतू आहे; मात्र काही ‘शॅक’ व्यावसायिक त्यांचे उपकंत्राट देत असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.’’
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group