देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्येय एका युवकाला आला आहे. या युवकाचे प्राण चमत्कारिकरीत्या वाचले आहे. 32 वर्षीय तरुण अनिकेत नलावडे यांना गाडी चालवताना हार्ट अटॅक आला होता. या दुर्दैवी अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. मात्र या अपघातात 15 मिनिटांहून अधिक काळ हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद राहून देखील अनिकेत नलावडे यांचा चमत्कारिकरित्या जीव वाचला आहे. नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात अपघाताची घटना घडली आहे.

घरात छातीत दुखायला लागल्यानंतर अनिकेत नलावडे पत्नीला घेवून कारने हॅास्पिटलच्या दिशेने चालले होते. मात्र कळंबोली जवळ येताच त्यांना जोरदार हृदविकाराचा झटका आला. त्यांचं गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी झालेल्या अपघातात त्यांनी बाईकस्वाराला उडवले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. गाडीत अडकलेल्या अनिकेत नलावडे यांना बाहेर काढून कळंबोली येथील व्हाईट लोटस रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात पोचल्यानंतर डॅाक्टरांनी तपासले असता त्यांचे हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद असल्याचं दिसून आलं. अनिकेत नलावडे जवळपास मृत्यूच्या दाढेत पोहचले होते. मात्र नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ विजय डिसूजा यांनी त्वरीत उपचाराला सुरवात केली. एक तास अथक प्रयत्न करत त्यांनी अनिकेत नलावडे यांना शुध्दीवर आणून त्यांचे प्राण वाचविले. डिसूजा यांनी आत्तापर्यंत जवळपास ५० हजार हृदयासंबंधीत शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्यासाठी देखील ही घटना चमत्कारीक होती. दरम्यान छातीत दुखायला लागल्यानंतर स्वत: कार चालवू नका असा सल्ला त्यांनी दिला.