एक अतिशय दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे. दोन लहानग्या बहीण भावांसाठी एक रात्र काळरात्र ठरली असून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघं झोपेत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. लहानग्या बहिण-भावाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.बीडच्या धारूर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोयाळ गावातील प्रदीप मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे शुक्रवारी रात्री घरात झोपले होते. मध्यरात्री त्यांच्या अंगावर विषारी साप चढला, दोघेही झोपेत असताना सापाने दोघांनाही दंश केला.
कोमल मुंडे आणि शिवम मुंडे असं मयत भावंडाची नावं आहेत. कोमल ही सात वर्षांची तर शिवम अवघ्या पाच वर्षांचा होता. सर्पदंशाने दोघांचा करुण अंत झाला आहे. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली असून, मुंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.