राज्यात उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार ! ''या'' 18 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
राज्यात उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार ! ''या'' 18 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
img
नंदिनी मोरे
राज्यात गेले काही दिवसांपासून हवामानात कमालीचे बदल झाले आहेत. एप्रिल महिन्याच्या उकाड्यानंतर मे महिनाय्च्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्यभरात जोरदार धुमाकूळ घातला आहे. दरम्यान आता  25 मे (रविवार ) म्हणजेच उद्या  राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये यावर्षी 24 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होतो. मात्र यावर्षी आठ दिवस आधीच तो दाखल झालाय. त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातही मान्सून लवकरच पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पाहुयात पुढील 24 तासांत राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल. 

25 मे रोजी मुंबईतील तापमान 24 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं. त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहून वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात तापमान 22 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान असून सामान्यतः ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये तापमान 26 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान असून त्याठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागांतील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, अमरावती, नागपूरसह विदर्भातील इतरही या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा याठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. विजेपासून अंतर ठेवावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर राज्यात मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता असल्याने देखील शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group