नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान , या संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपांनंतर परीक्षा रद्द झाल्याने काही विद्यार्थ्यांवर तीव्र मानसिक ताण आला. राजस्थान, दिल्ली आणि गोवा येथील तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर पश्चिम दिल्लीतील आदर्श नगर भागातील नीटची परीक्षा दिलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिला या परीक्षेत चांगले गुण मिळण्याची अपेक्षा होती, मात्र परीक्षाच रद्द झाल्याने तिला मोठा धक्का बसला होता.
तर दुसरीकडे राजस्थानच्या सिकर मधील एका 22 वर्षीय विद्यार्थ्यानेही आपलं आयुष्य संपवल्याचं उघड झालं. त्याने यापूर्वी 2 वेळा ही परीक्षा दिली होती, मात्र यंदा परीक्षेत उत्तम गुण मिळतील असा विश्वास त्याला होता. पण पेपर फुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली, याचा त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यातूनच त्याने हे पाऊल उचललं असावं असा संशय व्यक्त होत आहे.या घटनांपाठोपाठ गोव्यातही एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करत आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
दरम्यान, आता अखेर परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून 21 जून रोजी नीट परीक्षा पार पडणार आहे.