राज्यात आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण आता मनोज जरांगे यांनी राज्यसरकारला दिलेला अल्टिमेट संपला असून जरांगे यांनी एका मोठा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्याचे जाहीर करत, त्यांनी आगामी 30 मे पासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे.
"आतापर्यंत सरकारला गरजेपेक्षा जास्त वेळ दिला, 29 मे रोजी या आंदोलनाला तब्बल १० महिने पूर्ण होत आहेत; पण सरकारने फक्त आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. आता एकदाचा आरपारचा लढा होईल, एकतर सरकारचा तुकडा पडेल किंवा माझ्या जीवाचा!" अशा अत्यंत तीव्र शब्दांत जरांगे पाटलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी 30 तारखेपासून आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत हे उपोषण आतापर्यंत देशात झालेल्या आंदोलनांपेक्षा अधिक कठोर असेल, असा दावा केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “या वेळचं उपोषण रणरणत्या उन्हात होणार आहे. मी मंडपाखाली किंवा सावलीत बसणार नाही. थेट उन्हात बसून आंदोलन करणार आहे. मला उष्माघात झाला किंवा काही अनुचित घडलं तर त्याला राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.