राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी शेतशिवारात उपोषण सुरू केलं आहे. रणरणत्या उन्हात हे उपोषण सुरू केलं आहे. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अंतरवली सराटीत आज परत आले. त्यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, जरांगे यांनी आपण उपोषण सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी विखे पाटील यांनी त्यांना शासनाचा ड्राफ्टही दिला. कुणबी प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ करणाऱ्या एका अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना दिल्याचं विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या शेजारी बसूनच मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारी पातळीवर काय काय तयारी केली याची माहिती दिली.
आतापर्यंत 3 लाख प्रमाणपत्र दिले आहे. हैद्राबाद गॅझेट प्रमाणे नवीन प्रमाणपत्र देणार आहे. त्यासाठी वंशावळी निश्चित केली जात आहे. काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात निष्काळजीपणा होता, अधिकारी फाईल थांबवून ठेवायचे. काल कन्नडच्या (छत्रपती संभाजी नगरमधील) उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वंशावळी असतानाही, जिल्हाधिकाऱ्याचे आदेश असतानाही या अधिकाऱ्याने दाखले दिले नाहीत. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. अशा प्रशासकीय त्रुटी आम्ही दुरुस्त करत आहोत, असं सांगतानाच हैद्राबाद गॅझेटनुसार साधारण दोन हजार सर्टिफिकेट दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.