एअरपोर्टवर  फोटो काढणं पडणार महागात ! काय आहे 'हा' नियम ?
एअरपोर्टवर फोटो काढणं पडणार महागात ! काय आहे 'हा' नियम ?
img
Nandini khandare More


सोशल मीडियाचा फॅड असणाऱ्या काही लोकांना विमानतळावर फोटो सेशन करायला जाम आवडत.काही इंफ्लून्सर असतात जे  ट्रॅव्हल व्लॉग  किंवा रील्स विमानतळावर बनवत असल्याचं निदर्शनास येत परंतु आता हे सर्व काही करत असताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण आता  विमानतळावर फोटो काढणं चांगलंच महागात पडू शकत. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळ परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीबाबत अत्यंत कडक नियमावली जारी केली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट तुमचा मोबाईल जप्त केला जाऊ शकतो, दंड होऊ शकतो आणि सर्वात गंभीर म्हणजे तुम्हाला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकून विमान प्रवासावर बंदीही घातली जाऊ शकते.

सुरक्षेच्या कारणास्तव कठोर पावले
अलीकडच्या काळात प्रवाशांमध्ये विशेषतः सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समध्ये विमानतळावर ट्रॅव्हल व्लॉग्स, रील्स, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि पडद्यामागील व्हिडीओ बनवण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अनेकदा या ग्लॅमरस व्हिडीओच्या नादात नकळतपणे विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या हालचाली, निगराणी यंत्रणा आणि संवेदनशील पायाभूत सुविधांची माहिती सार्वजनिक इंटरनेटवर उपलब्ध होते. यामुळे विमानतळांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हाच धोका लक्षात घेऊन डीजीसीएने कठोर पाऊल उचलले आहे.

जर एखादा प्रवासी विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी फोटो किंवा व्हिडीओ काढताना पकडला गेला, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.मोबाईल जप्त आणि दंड: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाला मोठा आर्थिक दंड केला जाईल. तसेच गंभीर प्रकरणांमध्ये त्याचा मोबाईल फोन किंवा शूटिंगचे साहित्य जागेवरच जप्त केले जाईल. तसेच पुढील चौकशी केली जाईल.

‘नो-फ्लाय लिस्ट’चा धोका: गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यास, संबंधित प्रवाशाचे नाव डीजीसीएच्या ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये (No-Fly List) टाकण्याची शिफारस विमानतळ प्रशासन करू शकते. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार, त्या प्रवाशावर ठराविक काळासाठी किंवा कायमची विमानबंदी लादली जाऊ शकते.

कोणत्या ठिकाणी चित्रीकरणास सक्त मनाई?
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमानतळाच्या संवेदनशील आणि कार्यात्मक क्षेत्रांमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे बंदी असेल.

१. सुरक्षा तपासणी केंद्रे (Security Checkpoints) २. बोर्डिंग गेट्स (Boarding Gates) ३. रनवे बसेस (Runway Buses) ४. विमान हाताळणी क्षेत्रे (Aircraft Handling Areas) ५. विमानतळ ॲप्रन आणि टॅक्सीवे (Apron & Taxiway) ६. इतर सर्व प्रतिबंधित आणि अंतर्गत विभाग.

विमानतळावर सर्वत्र फोटोग्राफी बंद नाही
डीजीसीएने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, विमानतळावरील सर्वच भागांत फोटोग्राफीवर बंदी घालण्यात आलेली नाही. प्रवासी टर्मिनल्स, लाउंज आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये (Public Areas) काही मर्यादा पाळून फोटो काढू शकतात. मात्र, आपण ज्या भागात उभे आहोत तो भाग प्रतिबंधित श्रेणीत येत नाही ना, याची खात्री प्रवाशांनी स्वतः करणे आवश्यक आहे.

इन्फ्लुएन्सर्स आणि व्यावसायिक शूटसाठी काय नियम?
व्यावसायिक जाहिराती, चित्रपटांचे चित्रीकरण किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना व्यावसायिक कंटेंट तयार करायचा असल्यास, त्यांना नेहमीप्रमाणे विमानतळ प्रशासन आणि संबंधित उच्च अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. अधिकृत मंजुरी आणि विशेष पास असल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक चित्रीकरणाला परवानगी दिली जाणार नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group