मुंबई : एअर हॉस्टेस रुपलची हत्या करणाऱ्या आरोपी विक्रम अटवाल यांने आज सकाळी अंधेरीतील पोलीस लॉकअपमध्ये पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपलच्या हत्या प्रकरणी अटवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होते मात्र त्याआधीच त्याने आपले जीवन संपवले.लवकरच आरोपीचा मृतदेह जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. विक्रम इमारतीतच हाऊस किपिंगचे काम करायचा.
पवई पोलिसांनी या हत्येचा उलगडा अवघ्या 12 तासात केला होता. तपासादरम्यान मृत तरुणी तिच्या कुटुंबासोबत राहत असल्याचे समोर आले. आरोपी त्याच सोसायटीत साफसफाईचे काम करायचा. विक्रम अटवाल असे आरोपीचं नाव होतं. त्याचं वय सुमारे 40 वर्षे आहे.
तपासादरम्यान आरोपीने महिलेचा गळा कापल्याचे उघड झाले होते तसेच या दरम्यान आरोपीच्या हातालाही दुखापत झाली होती. तरुणीची हत्या करण्यासाठी अत्यंत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला होता.
आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि त्याच्या पत्नीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. याशिवाय पोलिसांनी सर्व बाजूंचा तपास करण्यासाठी सोसायटीत राहणाऱ्या इतर लोकांचीही चौकशी केली होती.