मुंबई : भारताचा महान फलंदाज विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत २३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात विराट कोहलीच्या खेळावरून सस्पेंस आता संपला आहे. विराट कोहलीची मान लचकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. विराटने त्या दुखापतीतून सावरण्यासाठी एक इंजेक्शन देखील घेतले आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ," विराट कोहलीच्या मानेला दुखापत झाली असून त्यासाठी त्याने इंजेक्शनही घेतले आहे. तो पहिल्या दोन उर्वरित रणजी ट्रॉफी सामन्यांपैकी एकही खेळणार नाही अशी शक्यता आहे आणि DDCA निवडकर्त्यांना अपडेट दिल्यास परिस्थिती स्पष्ट होऊ शकते." असे मानले जात होते की विराट कोहली किमान दिल्ली संघासोबत प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतो, परंतु या नव्या घडामोडीत त्याच्या मानेला झालेली दुखापत पाहता विराट कोहली राजकोटमध्ये दिल्ली संघात सहभागी होईल असे वाटत नाही.
सौराष्ट्रविरुद्ध रणजी सामना खेळणे कठीण
दिल्लीचा संघ २० जानेवारीला राजकोटला रवाना होणार असून सामना सुरू होण्यापूर्वी दोन सराव सत्रे होतील. DDCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "विराट कोहली उपलब्ध झाल्यास त्याचे नाव संघात जोडले जाईल. यापूर्वी ऋषभ पंतने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केले आहे." ऋषभ पंत दिल्लीचे कर्णधार असेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी रात्रीच टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नवीन धोरण लागू केले आहे. या धोरणात अनेक कठोर नियम आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल टीम इंडियाच्या खेळाडूंनाही शिक्षा होणार आहे.