राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे, सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारच्या कर धोरणांविरुद्ध इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने 14 जुलै 2025 बंद पुकारला आहे.
त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत, यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे.
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने म्हटले आहे की, सरकारने काही दिवसांपूर्वी दारूवरील व्हॅट दुप्पट केला आहे. त्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार वाढला आहे. त्याचबरोबर परवाना शुल्कात 15% आणि उत्पादन शुल्कात 60 % वाढ करण्यात आली असल्याने व्यापाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंदची घोषणा करण्यात आली आहे.
बार चालकांमध्ये नाराजी
इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संघटनांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. संघटनांचे म्हणणे आहे की, ही करवाढ व्यवसायासाठी हानिकारक आहे, त्याचबरोबर लहान आणि मध्यम दर्जाच्या हॉटेल्स आणि बार चालवणे कठीण बनले आहे. यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्यांवर आणि लाखो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, सरकारचे कर धोरण अन्यायकारक आहे. आम्ही याबाबत प्रशासनाला अनेक वेळा माहिती दिली आहे, मात्र आम्हाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही राज्यव्यापी बंदचा निर्णय घेतला आहे.