वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांकडूनही नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार अनेकदा केली जाते. अनेकदा पोलीस थेट त्यांच्याकडील मोबाईलवर फोटो काढून सोयीनुसार ई-चलान जारी करतात. हे असं करणं नियमांमध्ये बसत नाही.
याविरोधात यापूर्वीही अनेकदा वाहनचालकांकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मात्र आता या प्रकरणाची दखल थेट पोलीस खात्यानेच घेतली आहे.
सध्या पोलीस करतात काय?
तुम्ही अनेकदा सिग्नलवर किंवा चौकांमध्ये वाहतूक पोलीस त्यांच्या मोबाईलमधून एकामागोमाग एक वाहनांचे फोटो काढत असल्याचं पाहिलं असणार. खरं तर अशापद्धतीने एकाच वेळी फोटो काढून कारवाई करण्याची परवानगी नसते. म्हणूनच आता मोबाईल फोनवर फोटो काढून सोयीनुसार ई-चलान जारी करणाऱ्या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश मुंबईतील वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंकेंनी दिलेत. त्यांनी परिपत्रकाद्वारे या कारवाईचे आदेश दिलेत. वाहतूक संघटना आणि वाहनचालकांनी वारंवार हा विषय लावून धरला होता. सातत्याने यासंदर्भात येणाऱ्या तक्रारींनंतर पोलीस दलाने याबाबत कारवाईचे आदेश जारी केले आहेत.
याविरोधात कोणी आणि कुठे नोंदवलेला आक्षेप?
खरं तर वाहतूक पोलिसांना ई-चलान यंत्रणा देण्यात आली आहे. असं असतानाही अनेक पोलीस कर्मचारी त्यांच्या खासगी मोबाईलवर वाहनांचे फोटो काढून ते त्यांच्या सवडीनुसार ई-चलान यंत्रणेमध्ये अपलोड करतात. मोबाईलवरुन एकाच वेळी अनेक वाहनांचे फोटो पोलीस काढतात. त्यानंतर सवड मिळेल तसे एक एक फोटो अपलोड करुन संबंधित वाहनचालकांना ई-चलान पाठवलं जातं. हे असं करणं नियमांचा भंग असून याबाबत परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये वाहतूक संघटना प्रतिनिधींनी कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे वाहतूक विभागाकडून नवीन आदेश जारी करण्यात आला आहे.
नव्या नियमानुसार काय करावं लागणार?
नव्या आदेशाप्रमाणे वाहतूक नियमभंगाचा कारवाई करताना ई-चलान यंत्रणेद्वारेच पोलिसांना फोटो काढावे लागणार आहेत. खासगी मोबाईल फोनवरुन यापुढे वाहतूक पोलिसांना फोटो काढता येणार नाहीत. वाहतूक विभागाने अपर पोलीस महासंचालक प्रवणी साळुंखे यांनी जारी केलेल्या या आदेशांचं काटेकोरपणे पालन केलं जावं असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वाद टाळता येणार
अशाप्रकारे एकाच वेळी अनेक फोटो काढून ई-चलान जारी करण्याच्या मुद्द्यावरुन सजग वाहनचालक आणि पोलिसांमध्येही अनेकदा खटके उडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच आता नव्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली तर हे असले वादही टाळता येणार आहे. आता या नव्या नियमांचं किती पालन होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.