ख्रिसमसच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईमध्ये चर्चला आग लागल्याची घटना घडली समोर आली आहे . कोपरखैरणे येथील एका चर्चच्या तळमजल्यावर आग लागली. या आगीमुळे एकच खळबळ उडाली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणेमधील एका चर्चमध्ये भीषण आग लागली. चर्चमध्ये गर्दी असताना ही घटना घडली. चर्चमधील तळमजल्यावर ही आग लागली. आग लागल्यामुळे चर्चमध्ये आलेले अनेक जण पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन चर्चमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटांमध्येच आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली.
ख्रिसमसनिमित्त कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या स्टेज, लाईटची वायर आणि बाहेर उभ्या असलेल्या काही वाहनांना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.