मुंबईतील एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बोट बुडाली. या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. दरम्यान, या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मुंबईजवळील बुचर आयलंडजवळ दुपारी 3.55 वाजता नौदलाच्या स्पीड बोटने नीलकमल नावाच्या बोटीला धडक दिली. ही मोठी दुर्घटना आहे. या अपघातात 101 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
नौदलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत 13 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. त्यात 3 नौदल कर्मचारी आहेत. तर 10 नागरिकांना मृत घोषित करण्यात आलंय, अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. बेपत्ता लोकांसाठी शोध कार्य सुरूच आहे, असं फडणवीस म्हणाले.
तसेच ते म्हणाले, ही आकडेवारी अंतिम नसून अद्याप कोण बेपत्ता असेल किंवा मृत असेल, याची माहिती मिळेल, सध्या जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असं फडणवीस यांनी सांगितले.
या बोटीची क्षमत 80 प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. एकूण 110 प्रवाशी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलतांना फडणवीसांनी या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, मृत 13 जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.