ठाणे: राज्यात आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी करत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा हादरा बसला आहे.
पक्षाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे माजी राज्यमंत्री विनायक पाटील यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ठाणे येथील निवासस्थानी अत्यंत उत्साही वातावरणात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्णपणे अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर आणि मराठवाडा परिसरातील एक प्रभावी आणि ज्येष्ठ नेते म्हणून विनायक पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या रूपाने एक मोठा आणि अनुभवी चेहरा आता शिवसेनेला मिळाला आहे.
विनायक पाटील यांच्यासोबत लातूर ग्रामीण परिसरातील त्यांचे शेकडो निष्ठावान कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही हातात भगवा झेंडा घेतला. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.
या पक्षप्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर लातूर जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाला खिंडार पडले असून, मराठवाड्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे बोलले जात आहे. विनायक पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला आणि विशेषतः शिवसेनेला मोठी ताकद मिळेल,
असा विश्वास यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. या घडामोडींमुळे लातूरच्या स्थानिक राजकारणात आता मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.