शहरात वाढत्या वाहन चोऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नाशिकरोड पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. सिन्नर फाटा परिसरात अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून गुन्हे शोध पथकाने एका अट्टल दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिकरोड आणि अहिल्यानगर (संगमनेर) परिसरातील दुचाकी चोरीचे तब्बल ५ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून १ लाख ८३ हजार रुपये किमतीच्या ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी शहरात रात्रं-दिवस गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे शोध पथक १५ जून २०२६ रोजी दुपारी सिन्नर फाटा परिसरात गस्त घालत होते.
पथकातील अंमलदार सिन्नर फाट्यावरील 'महाराष्ट्र रसवंती गृहा'जवळ थांबलेले असताना, तिथे रस पिणाऱ्या एका इसमाने पोलिसांचे वाहन आणि साध्या वेशातील पोलिसांना पाहिले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने हातातील रसाचा ग्लास तसाच ठेवून आपल्या ताब्यातील स्प्लेंडर गाडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. क्षणाचाही विलंब न लावता झडप इसमाची ही संशयास्पद हालचाल पाहून पथकातील कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याचा पाठलाग करून त्याला जागीच पकडले.
कसून चौकशी आणि जुना गुन्हेगारी रेकॉर्ड उघड
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केली असता, त्याने आपले नाव ललित सागर देवरे (वय ३३, रा. उद्योग भवन, सिप्रा बिल्डिंगसमोर, सिन्नर) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केली, मात्र तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.
गुन्हे शोध पथकाने विविध पोलीस ठाण्यांचे रेकॉर्ड तपासले असता, या आरोपीवर कल्याण पोलीस ठाण्यात यापूर्वीच चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तो एक सराईत दुचाकी चोर असल्याचे निष्पन्न झाले.
५ गुन्ह्यांची कबुली, १.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त
संशयित ललित देवरे याला नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्याच्या ताब्यातील गाडीच्या चेसी आणि इंजिन नंबरची पडताळणी केली असता, ती गाडी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन 'मानवी कौशल्य' वापरत चौकशी केली असता, त्याने इतरही चोऱ्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील ०४ गुन्हे तर
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ०१ गुन्हा उघड झाला आहे. एकूण जप्त मुद्देमालात १,८३,००० किमतीच्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकाचे तपास अंमलदार पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आणि अर्जुन गिते यांनी केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.