कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या शोमधील हिमांशू जांग्रा नावाच्या तरुणाची केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आता या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रतिक्रया दिली आहे.
370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात मुलीकडून वसुलीची भाषा करणाऱ्या हिमांशू जांग्रा आणि कॉमेडियन प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण वादादरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँडअप कॉमेडीवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये, असं ते म्हणाले.
“आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीला भारताच्या संविधानाने अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. पण त्याचवेळी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये, अशा प्रकाराची अपेक्षासुद्धा भारताच्या संविधानाने व्यक्त केली आहे. ज्यावेळी समाजाची मर्यादा तोडून आपण अभिव्यक्ती करतो, त्यावेळी जे इतरांचं स्वातंत्र्य आहे, जे इतरांना आदराने राहण्याचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे, त्यावर आपण अतिक्रमण करतो. म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकालाच अभिव्यक्तीचा अधिकार आहे, स्टँडअप कॉमेडियन्सला तर आहेच,” असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी स्वत:देखील स्टँडअप कॉमेडीचे शोज पाहत असल्याचं म्हटलंय. “मी स्वत: स्टँडअप कॉमेडी मोठ्या प्रमाणात ऐकतो, ते मनोरंजनाचं साधन आहे. पण ते होत असताना मर्यादा काय आहेत, यादेखील आपण पाळल्या पाहिजेत. समाजाच्या इतर लोकांच्या आदरपूर्वक जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये, अशी माझी अपेक्षा आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.