कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये झालेल्या ‘370 रुपयांची बिर्याणी’ च्या मुद्द्यावरून वाद चांगलाच चिघळला असून त्या तरुणाला त्याचा जॉब गमवावा लागला आहे. दरम्यान आता प्रणित मोरे याच्या शोमधील एका डॉक्टर महिलेचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे आता ही महिला देखील चांगलीच ट्रॉल झाली आहे. आणि या महिलेने केलेल्या टप्पणीवरून आता केईएम रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे.
झालेला वाद अजून थंडही झालेला नसतानाच, त्याच शोमध्ये आलेल्या एका महिला डॉक्टरने केलेल्या घाणेरड्या कॉमेंटमुळे हाँ शो पुन्हा वादात सापडला आहे. केईएम रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार हिने प्रणित मोरेच्या शो ला हजेरी लावली होती, मात्र त्यावेळी प्रणितशी बोलताना तिने असंवदेनशीलपणाचा कळस गाठला. पुरुषाच्या मृतदेहाबद्दल बोलताना तिने प्रायव्हेट पार्टवरून जी टिप्पणी केली त्याने अनेकजण संतापले. यामुळे मोठी खळबळ माजली असून आता केईएम रुग्णालयाने याची दखल घेत यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
प्रणित मोरे याच्या स्टँड कॉमेडी शोला सेजल पवार हिने हजेरी लावली होती. ती एमबीबीएसची विद्यार्थिनी असून शेवटच्या वर्षाला आहे. या व्हिडीओमध्ये सेजल पवार हिने पुरुषांच्या मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल अत्यंत घाणेरडी कमेंट करत अश्लील वनोद केला होता. तिची क्लिप समोर येताच वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आणि सोशल मीडिया युजर्सनी भरमसाठ कमेंट्स करत सेजलवर टीका केली.
मात्र तिने त्या शोमध्ये केलेली विधान, त्यानंतर झालेला वाद या सर्व प्रकाराची आता KEM रुग्णालयाने दखल घेतली आहे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक याप्रकरणाबाबात भाष्य केलं असून चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितलं आहे. ” कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ, एक क्लिप व्हायरल होत आहे. त्या कॉमेडी शो मध्ये आमच्या एका विद्यार्थिनीने मृतदेहाबद्दल काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली. त्याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत. त्या व्हिडीओची हॉ्स्पिटल प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून याप्रकरणी दोन वरिष्ठ डॉक्टरांची कमिटी स्थापन केली आहे . यासंदर्भात आज संध्याकाळपर्यत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी अहवाल आल्यावर आम्ही ( त्या विद्यार्थिनीवर) योग्य ती कारवाई करू”, असं पाठक यांनी सांगितलं. ‘ तिने जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे. अवयव दान करतात त्यांच्या प्रति आम्हाला आदर आहे’ असंही डॉ. पाठक यांनी नमूद केलं.
दरम्यान सेजलचा हा व्हिडीओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात टीका, ट्रोलिंग झाले. त्यानंतर तिला चुकीची उपरती झाली असून तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी डॉ. सेजल पवार हिच्यावर टीकेचा आसूड ओढला. तिच्या असंवेदनशील टिप्पणीमुळे लोकं चांगलेच संतापले.
केईएम रुग्णालयातील डॉ. सेजल राहुल पवार यांनी अवयवदान आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आलेल्या मृतदेहांबाबत सार्वजनिक व्यासपीठावर कथितरीत्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका आरोग्य समिती सदस्य श्रद्धा (भारती) श्रीधर पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली आहे.