अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून नवनीत राणा २०१९ मध्ये खासदार बनल्या होत्या. भाजपा-शिवसेना युती असताना, मोदींच्या लाटेतही नवनीत राणांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत अमरावतीची निवडणूक जिंकली. मात्र, यंदा राज्यातील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. नवनीत राणांच्या भूमिकेकडे व अमरावतीच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु याचदरम्यान नवनीत राणा भाजपात प्रवेश करुन कमळाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली आहे.
नवनीत राणा यांनी महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवार बनून निवडणूक जिंकली असली तरी गेल्या ५ वर्षात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे समर्थन केले आहे. राज्यातील भाजपा नेत्यांच्या बाजुनेच त्यांनी सातत्याने भूमिका मांडली असून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील लढाईत शिवसेनेविरुद्ध आक्रमक पवित्राही घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे, भाजपकडून त्यांना यंदा संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यातच, राणा दाम्पत्याने मोदी सरकारच्या कामाचे अनेकदा कौतुक केले आहे. तर, उघडपणे भाजपाचे समर्थनही केल्यांच दिसून आलं. त्यामुळे, यंदा भाजपाच्या तिकीटावर त्यांना संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
भाजपाचा मेळावा ४ मार्च या दिवशी नागपूरमध्ये आहे. या मेळाव्यात अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघंही भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. आज याविषयी नवनीत राणा यांना विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणा म्हणाल्या आम्ही एनडीएबरोबर आहोतच त्यामध्ये त्यामुळे यात काही नवल वाटण्यासारखं नाही. नमो युवा संमेलन आहे एनडीएचे घटक म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. इतर लोक माझ्याविषयी काय चर्चा करत आहेत? काय बोलत आहेत? यामध्ये मी पडणार नाही. कोण राजकारणात येणार? कोण राजकारण सोडणार? हा विषय माझा नाही.” असं नवनीत राणा म्हणाल्या. आम्ही गरिबांसाठी काम करतो आणि तेच करत राहणार, असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.