मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित ; विद्यार्थी संघटना आक्रमक
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित ; विद्यार्थी संघटना आक्रमक
img
Dipali Ghadwaje

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- आठवडाभरापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाली होती. मात्र, आठ दिवस उलटत नाही तोच शिंदे-फडणवीस सरकारने परिपत्रक काढून मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला. आज अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना काल रात्री उशीरा यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

यानुसार या निवडणुका आता स्थगित झाल्या असून त्या पुन्हा कधी होणार? यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलेले नसल्यामुळे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाची कसोटी लांबणीवर पडलेली आहे. तर त्यांच्यासमोर आलेल्या अमित ठाकरेंशी त्यांचा सामनाही लांबला आहे.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाची जाहिर करण्यात आलेली नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणुक येत्या 10 सप्टेंबर, 2023 रोजी होणार होती. यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आलेल्या असतानाच या निवडणुकीस सरकारने दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या विशेष सभेत निर्णय घेऊन अनिश्चित काळासाठी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या निवडणुकीची मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा असून सर्वच विद्यार्थी संघटनांनी निवडणुकीसाठी कंबर कसली होती. ठाकरे गटाची युवा सेना व मनसेची विद्यार्थी सेना यांनी मतदार नोंदणीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. या दोन संघटनांमध्येच हा थेट सामना होईल, असेही बोलले जात होते. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत या दोन्ही संघटना व त्यांचे नेते, अर्थात आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

दरम्यान, ही निवडणूक स्थगित झाल्याने, सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेले पाहिले पाऊल आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी हल्लाबोल केला आहे.

मतदार नोंदणीत युवसेनेच्या ठाकरे गटाने आघाडी घेतल्याची चर्चा होती. दहा पैकी दहा जागांसाठी युवासेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात शक्ती प्रदर्शन करीत अर्ज भरणार होते. छात्र भारती विद्यार्थी संघटनेने राखीव प्रवर्गातील पाच व खुल्या प्रवर्गातील दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे जाहीर केले होते. मात्र या सगळ्यामध्ये शिंदे गटाच्या भूमिकेबाबत अस्पष्टता होती.

इतर बातम्या
Join Whatsapp Group