सोनारांच्या भिशीत जादा परताव्याचे  आमिष; महिलेची 77 लाखांची फसवणूक
सोनारांच्या भिशीत जादा परताव्याचे आमिष; महिलेची 77 लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सोनारांच्या भिशीत रक्कम गुंतविल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, तसेच सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून महिलेची एकाच कुटुंबातील तिघांनी 76 लाख 47 हजार 620 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला व आरोपी प्रशांत रवींद्र पोतदार, रेणुका रवींद्र पोतदार व रवींद्र पोतदार हे एकमेकांशी परिचित आहेत. दरम्यान, आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादी पंडित यांना सोलापूरच्या सोनाराच्या भिशीमध्ये रक्कम गुंतविल्यास त्यातून मोठा परतावा मिळेल, असे खोटे आश्वासन दिले. त्यानुसार महिलेने गुंतवणूक करण्यासाठी दिलेली रक्कम व त्यावरील मोबदला परत न करता, तसेच शुद्ध करण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने परत न करता त्याचा अपहार केला. 

एवढेच नव्हे, तर फिर्यादी यांच्या नाशिक येथील फ्लॅटवर बनावट स्वाक्षरी करून कर्ज काढून ती रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यासाठी घेऊन ती परत केली नाही. हा प्रकार दि. 27 जून 2017 ते 22 मे 2024 या कालावधीत फिर्यादी यांच्या घरी व सटाणा बस स्टॅण्डसमोरील सुभाष रोड येथे घडला. या प्रकरणात पोतदार कुटुंबीयांनी फिर्यादी महिला यांची एकूण 74 लाख 47 हजार 621 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.




crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group