रिसॉर्ट मालकाकडून दोघांना 36 लाख रुपयांचा गंडा
रिसॉर्ट मालकाकडून दोघांना 36 लाख रुपयांचा गंडा
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- स्टोन वॉटर रिसॉर्ट हे भाडेतत्वावर देण्याची बोलणी करुन 2 तरुणांचा विश्‍वास संपादन करुन त्यांच्याकडून वेळोवेळी रिसॉर्टच्या दुरुस्तीकामी व साहित्य खरेदीसाठी एकूण 36 लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक करुन रकमेचा अपहार  केल्याप्रकरणी रिसॉर्ट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हितेश राजकुमार अच्छरा (रा. गोदापार्कजवळ, सहदेवनगर, गंगापूर रोड, नाशिक) हे व्यापारी असून, ते कुटुंबियासह राहतात. त्यांचे वडील गेल्या 35 वर्षांपासून शहरात जमिन खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. फिर्यादी अच्छरा व त्याचा मित्र अतुल शर्मा हे दोघे जण भागीदारीमध्ये कॉलेजरोड येथे बर्गर पॉइंट या नावाने हॉटेल चालवितात. फिर्यादी यांना हॉटेल व रेस्टॉरंट चालविण्याचे चांगले ज्ञान असून, त्यांची मित्र अर्श शर्मा यांची झिल हॉस्पीटॅलिटी या नावाची रजिस्टर पार्टनरशिप फर्म आहे.'

सन 2022 मध्ये हॉटेल व्यावसायात वाढ होण्यासाठी शहराजवळ एखादे रेस्टॉरंट किंवा रिसॉर्ट चालविण्यासाठी घेण्याचे ठरवले. त्यानुसार शहरात ब्रोकर म्हणून काम करणारा समिर कडवे हा अच्छरा यांच्या बर्गर पॉइंटवर आला. त्याने नाशिक तालुक्यातील पिंपळद येथे प्रमोद वसंत कुटे यांच्या मालकीचे स्टोन वॉटर रिसॉर्ट असून, ते सध्या बंद आहे. कुटे हे त्यांचे रिसॉर्ट भागीदारी तत्वावर चालविण्यासाठी देण्यास इच्छुक आहेत. त्यानंतर फिर्यादी अच्छरा व त्यांचा मित्र शर्मा असे दोघे जण कुटे यांच्या रिसॉर्टवर जाऊन पाहणी करुन आले. तेथे अनेक कामे अपूर्ण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रमोद कुटे आणि फिर्यादी यांच्यामध्ये व्यवहाराच्या संबंधाने प्रमोद कुटे याच्या इंदिरानगर येथील राहत्या घरी नियमित बोलणी होवू लागली. त्यावेळी कुटे हे रिसॉर्टमध्ये भागीदारीसाठी 30 लाख रुपये गुंतवणूक करण्याबाबत सांगत होते. मात्र ही रक्कम खूप जास्त असल्याने कुटे यांना 16 लाख रुपये वेळोवेळी देण्यात आले.

16 लाख रुपयांची रक्कम मिळाल्यानंतर आरोपी कुटे याने रिसॉर्टच्या दुरुस्तीची कामे केली. त्यामध्ये स्विमिंग पुल, लॉन्स आदी आवश्यक कामे केली. त्या दरम्यान फिर्यादी अच्छरा व शर्मा यांनी आणखी 15 लाख रुपये खर्च करुन रिसॉर्टसाठी टेबलखुर्च्या किचनसाठी भांडी, फर्निचर, सजावटीसाठी लाईट फिटींग, म्युझिक सिस्टीम, रुममध्ये राहणार्‍या ग्राहकांसाठी आवश्यक कपडे, गॅस सिलिंडर, तसेच स्टाफ क्वॉर्टरसाठी फर्निचर तयार करुन घेतले. ही सगळी कामे झाल्यानंतरही रिसॉर्ट चालविण्यासाठी मागितले असता आरोपी कुटे याने आणखी पैशांची मागणी केली म्हणून अच्छरा यांचे पार्टनर अर्श शर्मा याने त्याचे वडील अतुल सोहनलाल शर्मा यांच्या बँक खात्यातून 12 ऑक्टोबर 2022 रोजी 1 लाख रुपये व त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा आरोपी कुटे याच्या बँक खात्यावर 4 लाख रुपये जमा केले.

त्यानंतर कुटे याने 31 डिसेंबर 2022 रोजी स्टोन वॉटर रिसॉर्ट फिर्यादी व त्यांच्या मित्राला चालविण्यासाठी दिले. रिसॉर्टच्या व्यवसायातून मिळणार्‍या रकमेपैकी आरोपी कुटे याला दरमहा 35 टक्के रक्कम द्यायची याबाबतचा दस्त व करारनामा करण्याबाबत त्याला वारंवार सांगितले. परंतु आरोपी कुटे याला फिर्यादीकडून 16 लाखांची रक्कम मिळाल्याने व त्यानंतर देखील 15 लाख रुपये खर्च करुन रिसॉर्टमध्ये सुविधा निर्माण केल्या. तसेच पुन्हा मागणी केल्याप्रमाणे 5 लाख रुपये देऊनही त्याने करारनामा करुन देण्यास टाळाटाळ केली. अखेर त्याच्याकडे तगादा लावल्यानंतर 15 मे 2023 रोजी आरोपी प्रमोद वसंत कुटे (रा. युनिक रेसिडेन्सी, मोदकेश्‍वर कॉलनी, इंदिरानगर) याने 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मेमोरंडम ऑफ अन्डरस्टॅण्डींगचा दस्त लिहून दिलेला आहे. हे अ‍ॅ्रगीमेंट दि. 1 जानेवारी 2023 पासून पुढील 5 वर्षांसाठी करण्यात आलेले आहे. हा दस्त अ‍ॅडव्होकेट व नोटरी अतुल सानप यांच्याकडे नोंदविण्यात आलेला आहे.

आरोपी कुटे यास लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स असा दस्त बनवून देण्याबाबत वारंवार सांगूनही त्याने तसे न करता मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डींगचा दस्त तयार केलेला आहे. दरम्यान, फिर्यादी हितेश अच्छरा व त्यांचे पार्टनर अर्श शर्मा यांनी हे रिसॉर्ट मोठ्या उत्साहाने चालू केले. मात्र त्यात नुकसान होऊ लागल्याने व ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कुटे याला दरमहा देण्यात येणार्‍या 35 टक्के रक्कम कमी करण्याबाबत सांगितले. मात्र त्याने नकार दिला. त्यानंतर फिर्यादी व त्याच्या पार्टनरने रिसॉर्टमध्ये होत असलेल्या तोट्यामुळे हे रिसॉर्ट सोडण्याचा विचार केला. त्याबाबत आरोपी कुटे यांना वेळोवेळी दिलेले पैसे करण्याबद्दल विचारणा केली असता त्याने माझे एका पार्टीशी बोलणे चालू असून, लवकरच तुमचे पैसे देतो असे सांगितले.

मात्र अद्यापपर्यंत पैसे दिले नाही. त्यातच फिर्यादी यांना इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन समजले की, आरोपी कुटे याने स्टोन वॉटर रिसॉर्टचे रिओपनिंग 13 जानेवारी 2024 रोजी करण्याचे मॅसेज टाकला आणि हे रिसॉर्ट पुण्याच्या इसमाला दिल्याचे समजले. दरम्यान फिर्यादी व त्याच्या पार्टनरशी केलेला करारनामा पुढील 5 वर्षांसाठी असताना त्याची मुदत संपली नसताना तो रद्द करण्यात आला नाही. असे असतानाही आरोपी कुटे याने फिर्यादी व त्याच्या पार्टनरला रिसॉर्टमधून धमकी देऊन हुसकावून दिले.

तसेच फिर्यादी यांनी स्वखर्चाने रिसॉर्टसाठी 15 लाख रुपयांची दुरुस्ती करुन तसेच रिसॉर्टच्या रिन्यूऐशनसाठी दिलेले 16 लाख रुपये आणि अतुल शर्मा यांच्या बँक खात्यावरुन दिलेले 5 लाख रुपये परत न करता आरोपी कुटे याने एकूण 36 लाख रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात प्रमोद कुटे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group