
१५ फेब्रुवारी २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव शिवारात मिस्टिक व्हॅली या भागात असलेल्या न्यूयॉर्क व्हिला या आलिशान व्हिलामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून 11 जुगार्यांसह 6 लाख 72 हजार 970 रुपयांची रोकड व एकूण 18 लाख 79 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या व्हिलामध्ये जुगार खेळताना सापडलेल्या जुगार्यांमध्ये नाशिकसह मुंबई, ठाणे, डोंबिवली व अनेक भागांतील प्रतिष्ठितांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक जण नेपाळचा असून, पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये नेपाळ देशाच्या 70 हजार 720 रुपये किमतीच्या चलनी नोटा, तसेच 35 हजार 760 रुपये किमतीचे देशी-विदेशी मद्य, बीएमडब्ल्यू आलिशान कारसह दोन ह्युंडाई क्रेटा कार व मारुती स्विफ्ट अशा चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी ग्रामीण भागातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तपास करीत असताना अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना इगतपुरीजवळील न्यूयॉर्क व्हिलामध्ये काही इसम एकत्र येऊन बेकायदेशीरपणे 52 पानी पत्त्यांवर रोख रक्कम लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार दि. 15 च्या मध्यरात्री अपर पोलीस अधीक्षक मिरखेलकर यांनी त्यांच्या पथकासह धाड टाकली आणि मोठे घबाड हाती सापडले.
जुगार खेळताना रंगेहाथ अटक केलेल्या जुगार्यांमध्ये दत्ता नवले (रा. पाथर्डी फाटा, नाशिक), महादेव खवणे (रा. खुटवडनगर, सिडको), श्रेयस श्रीवास्तव (रा. मिरा रोड, मुंबई), दिनकर कपूर (रा. वसई), अमिन चंद्रावर (रा. मिरा रोड, मुंबई), हितेश तनवडे (रा. कांदिवली पूर्व, मुंबई), आनंद सरोज व अविनाश शिपाई (दोघेही रा. वाघली, जि. ठाणे), शिवाजी मंदारे (रा. पवननगर, नवीन नाशिक), अतुल रावल (रा. शिळ फाटा, ठाणे), संतोष मुळे (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक), अमर टंडन (रा. नेपाळ), सतीश पांडे (रा. डोंबिवली, जि. ठाणे), अभिषेक कश्यप (रा. एटा, उत्तर प्रदेश), राजेश जिवानी (रा. द्वारका, नाशिक), कल्पेश गोजरिया (रा. सिडको, नाशिक), सुरेश सद्गीर (रा. गायकवाडनगर, इगतपुरी) यांच्यासह न्यूयॉर्क व्हिलाचा मॅनेजर यशकुमार ऊर्फ शेरासिंग भगतसिंग (मूळ रा. सांताक्रूझ, मुंबई) यांचा समावेश आहे. न्यूयॉर्क व्हिला हा शक्ती ढोलकिया (रा. जुहू तारा रोड, सांताक्रूझ, मुंबई) यांच्या मालकीचा असल्याचे समजते. सर्व आरोपींविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 4 व 5, तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे, अंमलदार मयूर कांगणे, योगेश्वर तनपुरे, नीलेश देवराज, शुभम् गुरव, किरण आहेर, पंकज दोंदे, सुनील जगताप, संदेश भिसे, किशोर वाघेरे व मेघा कातकाडे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
Copyright ©2025 Bhramar