सिडकोत 14 लाखांची घरफोडी
सिडकोत 14 लाखांची घरफोडी
img
दैनिक भ्रमर

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे 14 लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना सिडकोत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ज्ञानोबा रूपला पवार (रा. स्वामी विवेकानंदनगर, सिडको, नाशिक) हे दि. 4 ते 6 ऑगस्टदरम्यान बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.
यावेळी घरातील बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची उचकापाचक केली.

त्यात 90 हजार रुपये किमतीचे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 30 हजार रुपये किमतीचा दीड तोळा वजनाचा सोन्याचा नेकलेस, 40 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, दहा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे जोड, दहा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील वेल, 20 हजार रुपये किमतीचा एक तोळा वजनाचा सोन्याचा झुबा, सहा हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे जोड, 66 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या गळ्यातील चेन, 88 हजार रुपये किमतीच्या 11 अंगठ्या, तसेच 10 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच पासपोर्ट व बंजारा समाजाचा पारंपरिक साज असा एकूण 14 लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
 

crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group