सातपूरला तरुणावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याचा कोयत्याने प्राणघातक हल्ला
सातपूरला तरुणावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याचा कोयत्याने प्राणघातक हल्ला
img
दैनिक भ्रमर
सातपूर -  श्रमिकनगर येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला कोयता व लाकडी दांड्याने जबरी मारहाण केल्याची घटना काल (दि.3 ) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. घटस्थापनेच्या दिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरूवार (दि.३) सायं ६ वाजेच्या सुमारास श्रमिकनगर येथील राधाकृष्णनगर मधील धात्रक चौकामध्ये दुचाकीवरून  श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या रिक्षामधील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. दुचाकीवरील दोन जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले. परंतु अतुल खरे (रा. हिंदी शाळा, श्रमिकनगर) या तरुणास या टोळक्याने सिनेस्टाईल मध्ये हॉकी स्टिक, स्टम्प व कोयत्याने डोके, पाठ व पायावर जबरी वार केले.

वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्या मुळे कोणीही मध्ये पडण्याची हिंमत केली नाही. सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खाजगी दवाखान्यात नेले परंतु, हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, अशोकनगर, गंगासागर नगर परिसरात अशा घटना नेहमी होत असल्याने नागरिकांनी सातपूर पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

दहशत माजवणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group