नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कंपनीशी कोणताही संबंध नसताना स्वत:च्या मालकीची कंपनी स्थापन करुन ती अन्य कंपनीत विलिन झाल्याची खोटी माहिती सादर करुन दोन माजी कर्मचार्यांनी कंपनी मालकाची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विवेक ग्यानूजी मोगल (वय 69, रा. आनंदवली) यांची व्हर्च्युअल कन्स्ट्रक्शन सोलुशन या नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये आरोपी निरव किरण शहा (वय 42, रा. उंदरी, पुणे) व अनघा निरव शहा (रा. देनाविजय कॉलनी, उंटवाडीरोड, नाशिक) हे दोघे जण या कंपनीमध्ये काम करत होते. मात्र कालांतराने या दोघांनीही कंपनीत काम करण्याचे सोडून दिले.
त्यांचा या कंपनीशी कोणताही संबंध नसतानादेखील त्यांनी त्यांच्या मालकीची एएनएस डिझाईन स्टुडिओ नावाची कंपनी स्थापन केली. ती कंपनी फिर्यादी मोगल यांच्या व्हीसीएस बिम एलएलसी या कंपनीमध्ये विलिन झाल्याची खोटी माहिती प्रसारीत केली. फिर्यादी मोगल यांच्या कंपनीशी करारबद्ध असलेल्या नोव्हा सर्व्हिसेस इन या कंपनीस पाठवले. तसेच अमन कुमार व कल्पेश कोकीटकर हे मोगल यांच्या व्हर्च्युअल कन्स्ट्रक्शन सोल्युशन या कंपनीमध्ये काम करत असल्याचे माहित असूनही हे दोन्ही कर्मचारी आरोपींच्या एएनएस डिझाइन स्टुडिओ या कंपनीमध्ये काम करतात, अशी खोटी माहिती नोव्हा सर्व्हिसेस इंक या कंपनीस दिली.
त्यानंतर आरोपींच्या नावे असलेल्या एएनएस डिझाईन कंपनीच्या नावाचे त्या दोन कर्मचार्यांच्या नावे बनावट ई-मेल तयार केले आणि फिर्यादीच्या कंपनीला नोव्हा सर्व्हिसेस इंक कंपनीकडून मिळालेले 3 कोटी रुपयांचे कंत्राट आरोपी निरव शहा व अनघा शहा यांनी हे कंत्राट स्वत:च्या कंपनीकडे घेऊन फिर्यादी व त्यांच्या कंपनीची 3 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 1 जानेवारी 2024 पासून 29 जानेवारी 2025 या कालावधीत एएनएस डिझाईन स्टुडिओच्या कार्यालयात घडला.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात विवेक मोगल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित निरव शहा व अनघा शहा यांच्याविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.