पतीशी भांडण झाल्यानंतर एका महिलेने जे केलं ते ऐकून तुमच्याही अंगचा थरकाप उडले. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, या महिलेने तिच्याच पोटच्या दोन मुलांना वेठीस धरत त्यांना थेट 23 मजल्यावर लटकावलं. 23 व्या मजल्यावरील मुलांना पाहून इतर लोकांच्या पायाखालची जमीनचसरकली आणि त्यांनी त्या महिलेवर शिव्यांचा वर्षाव करत टीकेचा भडिमार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सेंट्रल चीनमधील हेनान प्रांतातील लुओयांग येथे घडली. एका बहुमजली इमारतीच्या 23 व्या मजल्यावर असलेल्या अपार्टमेंटच्या बाहेरील एसीला दोन मुलं लटकलेली दिसताच लोकांचा थरकाप उडाला. शेजाऱ्यांच्या सांगण्यानुसार, त्या दोन्ही मुलांची आई शेजारच्या खिडकीत होती आणि पतीच्या नावाने ओरडत होती. तेवढ्यात एक व्यक्ती त्या मुलांना वाचवण्यासाठी पुढे सरसावली पण तिने त्याला रोखलं.
या धक्कादायक घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामध्ये दोन लहान मुलं एसीच्या युनिटवर बसलेली दिसत आहेत. तर त्यांच्या बाजूलाच खिडकीत बसलेली आई मात्र मुलांचा जीव धोक्यात घालून पतीशी भांडण्यात मग्न होती. ती सतत ओरडत होती, चिडलेली होती तर तिचा पती मात्र शांत होता आणि त्यांच्या मुलांना आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता. तो खिडकीच्या दिशेने पुढे आला पण त्याच्या बायकोन त्याला थांबवलं.
हा सगळा प्रकार पाहून शेजारीही हबकले होते, पण त्यांनी प्रसंगावधान दाखवून लगेचच पोलिसांना या घटनेची सूचना दिली. त्यानंतर पोलिस तसेच फायर ब्रिगेडची टीमही घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी त्या मुलांना वाचवलं. मात्र हा भीषण प्रकार करणाऱ्या त्या महिलेविरोधात नेमकी काय कारवाई करण्यात आली हे अद्याप समजू शकलेलं नाही. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल झाला असून लोकांनी तिच्यावर टीकेचा वर्षाव केलाय.