भूखंड विक्री करण्याचे आश्‍वासन देऊन बिल्डरची एक कोटीची फसवणूक
भूखंड विक्री करण्याचे आश्‍वासन देऊन बिल्डरची एक कोटीची फसवणूक
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बांधीव भूखंड विक्री करण्याचे आश्‍वासन देऊन त्या मोबदल्यात एक कोटी रुपये स्वीकारून तो भूखंड विक्री न करता वृद्ध बिल्डर्सची फसवणूक करणार्‍या मुंबईच्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अशोक काशीनाथ तलवारे (वय 68, रा. विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड) हे बिल्डर आहेत. आरोपी कै. चंद्रकांत हरी थत्ते व त्यांचा मुलगा शशांक चंद्रकांत थत्ते यांनी त्यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 715 अ/5, क्षेत्र 2 हजार चौ. मी. पैकी 800 चौ. मी. या गंगापूर रोडवरील जागेत कमलाकांत नावाची इमारत असलेला बांधीव भूखंड होता.

हा भूखंड फिर्यादी अशोक तलवारे यांना विक्री करण्याचे आश्‍वासन देऊन त्याबाबत नोटरी करारनामा केला होता. या व्यवहाराच्या मोबदल्यात तलवारे यांच्याकडून संशयित थत्ते यांनी एक कोटी रुपये बँक खात्यात स्वीकारले होते; मात्र थत्ते यांनी ही मालमत्ता तलवारे यांना विक्री न करता त्याची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली, तसेच या मालमत्तेचा ताबा व खरेदी मागितली असता तलवारे यांना दमदाटी केली.

हा प्रकार दि. 9 नोव्हेंबर 2006 ते दि. 31 मे 2007 या कालावधीत गंगापूर रोड येथे घडला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तलवारे यांच्या फिर्यादीनुसार शशांक थत्ते याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group