मध्य प्रदेश बऱ्हाणपूर कडून मुक्ताईनगर केंद्र असणाऱ्या व तिथून महाराष्ट्रामध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला लाखो रुपयांचा गुटखा विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वरिष्ठ पत्रकार प्रदीप गायके यांनी गाडीचा पाठलाग केल्यामुळे गुटख्याच्या अंदाजे चार लाख रुपये किमतीच्या पुड्या पोलिसांनी जप्त केल्या. स्विफ्ट डिझायर गाडी MH 19 BJ 3771 मध्ये मुक्ताईनगर कडून जामनेर कडे ही गुटखा वाहतूक होत होती.
बोदवड रोडवरील मोठ्या पुलापासून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु चालकाने गाडी न थांबवता ही कार जामनेर शहरात जळगाव रोडवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. प्रदीप गायके यांनी स्वतः या गाडीचा पाठलाग केला आणि या स्विफ्ट डिजायर कार मध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना दिली. जळगाव रोड वरील संत तुकाराम महाराज मराठा मंगल कार्यालयाजवळ पत्रकार प्रदीप गायके यांनी ही गाडी रोखून धरली.
सिनेस्टाईल असा हा प्रकार घडला असुन स्विफ्ट कारचा चालक पवन मोहित गोसावी याने गाडी मधून लॉक केली आणि तो बाहेर आला नाही. पोलिसांनी गाडीसह आरोपीला जामनेर पोलीस स्थानकात आणले.
हा गुटखा चालक गोसावी याचा व त्याचे भागीदार मुक्ताईनगर येथील गुटखा माफीया योगेश गोसावी व अनुपम गोसावी यांचा असल्याचे सांगितले. तो गुटखा मध्य प्रदेशाकडून मुक्ताईनगर मार्गे जामनेर तालुक्यात विक्रीसाठी येणार होता.
स्विफ्ट गाडी ला पूर्णपणे काळ्या रंगाच्या फीत लावलेल्या होत्या. त्यामुळे आत मध्ये काय आहे हे काही कळायला मार्ग नव्हता.या स्विफ्ट कार मध्ये मागचे सीट काढून त्या ठिकाणी गुटख्याच्या गोण्या भरून ठेवण्यात आल्या होत्या.बाजार मूल्यानुसार हा गुटखा चार लाख तीस हजार रुपयाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा गुटखा पंचनामा करून पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आला. जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे अतुल पवार हे अधिक तपास करत आहे.