२५ जुलै २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- वाईन शॉपच्या व्यवसायात 50 टक्के भागीदारीचे आमिष दाखवून भावानेच भावाची सुमारे 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जगन्नाथ नामदेव निगळ (वय 69) व आरोपी गोकुळ नामदेव निगळ (वय 55, दोघेही रा. निगळ गल्ली, सातपूर गाव, नाशिक) हे दोघे भाऊ आहेत. यातील आरोपी गोकुळ निगळ याने फिर्यादी जगन्नाथ निगळ यांना हेवर्ड्स 5000 या वाईन शॉपचे लायसन्स पार्टनरशिपमध्ये घेऊन दोघेही प्रत्येकी 50 टक्के भागीदारीचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करून
68 लाख 73 हजार 20 रुपये व इतर खर्च निगळ कृषी सेवा केंद्र या संस्थेच्या नावावर कर्ज काढून खर्च करावयास लावले. सातपूर गावातील त्र्यंबक रोड येथे प्रत्यक्ष वाईन शॉप सुरू झाल्यानंतर आजपर्यंत आरोपी गोकुळ निगळ दुकानाच्या व्यवसायातून येणारे पेमेंट स्वत:चा फायदा व्हावा, या उद्देशाने भागीदारी संस्थेच्या बँक खात्यावर न घेता स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होण्यासाठी स्वत:च्या बँक खात्याचे क्यूआर कोड दुकानामध्ये ठेवले आहे व त्यातील मिळणारी रक्कम फिर्यादी जगन्नाथ निगळ यांच्या संमतीशिवाय स्वत:च्या फायद्यासाठी वापरून भावाचीच फसवणूक केली.
हा प्रकार सन 2014 पासून ते 24 जुलै 2024 या कालावधीत निगळ कृषी सेवा केंद्र, सातपूर गाव येथे घडला. या फसवणुकीप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गोकुळ निगळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar