मावळमधून एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. अनैतिक संबंधातून प्रेग्नंट राहिलेल्या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. नंतर त्या महिलेच्या मृतदेहाची इंद्रायणीच्या पात्रात विल्हेवाट लावण्यात आली. त्यावेळी आरडाओरड करणाऱ्या तिच्या मुलांनाही इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. राज्याला हादरवून सोडणारी ही घटना पुण्यातल्या मावळात घडली आहे.
तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अनैतिक संबंधामुळे गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला होता.
या घटनेतील आरोपीने शिताफीने इंद्रायणीच्या पात्रात महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी महिलेच्या दोन्ही मुलांनी आरडाओरड केली. त्यामुळे त्या मुलांना आरोपीने नदीतमध्ये फेकून दिलं. या धक्कादायक घटनेनंतर आंबी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. पोलिस आरोपीच्या शोधात असून घटनेचा कसून तपास सुरु आहे.
नेमकी घटना काय?
विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला अन् तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आलं आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही संतापजनक घटना 9 जुलैला घडली.
मिळालेल्या माहितीनुसार , 6 जुलैला गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचं गर्भपात करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला.
पुढे गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं. दुसऱ्या दिवसांपासून हे दोघेही काही घडलंच नाही, असं वावरू लागले. दरम्यानच्या काळात महिलेसोबत तिच्या कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्यानं, तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली.
मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. महिलेला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होते. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. मग दोघांनी घडला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.