नवी दिल्ली : आज कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी सकाळी कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि युद्धात बलिदान दिलेल्या शहीदांना पुष्प अर्पण केले. 1999 च्या कारगीर युद्धात, सैनिकांनी उंच डोंगरावर बसलेल्या शत्रूंचा सामना करून शत्रूंना हुसकावून लावले होते. पंतप्रधानांनी कारगिल वॉर मेमोरियल क्लबमधील युद्ध स्मारकावर शहीद जवानांना अभिवादन केले. देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा अभिमानाचा दिवस असल्याचे ते म्हणाले.
आज संपूर्ण देश कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी या खास प्रसंगी शिंकुन ला बोगद्याची पायाभरणी करणार आहेत. शिंकू ला टनेल प्रकल्पाचे काम सुरू होणार असून खराब हवामानात लेहशी संपर्क सुधारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा बोगदा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. हा बोगदा म्हणजे, सीमेपर्यंत रसद पुरवण्यासाठी तिसरा आणि सर्वात सुरक्षित पर्याय असेल.
सध्या लेह लडाखसाठी पाकिस्तान सीमेला लागून असलेला झोजी ला पास हा पहिला पर्याय आहे आणि दुसरा पर्याय चीन सीमेला लागून असलेला बर लाचा पास आहे. आता हा तिसरा मार्ग शिंकू ला पास येथील बोगद्याच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे.
निमू-पदुम-दारचा रोडवर 15,800 फूट उंचीवर बांधण्यात येणारा शिंकुन ला हा ट्विन ट्यूब बोगदा 4.1 किलोमीटर लांबीचा असेल. कसेही हवामान असले तरी, या बोगद्याद्वारे लेहबरोबरचा संपर्क कायम राहील. या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, हा शिंकुन ला बोगदा जगातील सर्वात मोठे टनेल असेल. हा बोगदा केवळ सशस्त्र दल आणि उपकरणांची जलद तसेच कार्यक्षमतेने ने-आण करण्यासाठी फायदेशीर ठरणार नाही तर, लडाखच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालनादेखील देईल.
भारत सरकारकडून जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये रणनीतीच्या दृष्टीने अनेक बोगदे बांधले जात आहेत. हा संपूर्ण परिसर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. नवीन बोगद्यांच्या निर्मितीमुळे एलओसी आणि एलएसीवरील लष्कर आणि इतर निमलष्करी दलांची हालचाल अधिक सुलभ होत आहे. या बोगद्यांमुळे कोणत्याही मोसमात लष्करी उपकरणे आणि सैनिकांच्या वाहतुकीला अडसर येणार नाही. याशिवाय प्रादेशिक विकासाला चालनादेखील मिळत आहे.