मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली यावेळी ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणालेउद्धव ठाकरे?
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसव्या घोषणांचा पाऊस पडत आहे. लाडकी बहीण-भाऊ वगैरे सुरु असतानाच लाडका मित्र किंवा लाडका काँट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती अशी योजना सुरु झाली आहे. गेल्या वर्षी आम्ही धारावीत मोर्चा काढला होता. आमची मागणी आहे की, धारावीवासियांना आहे तिथेच पाचशे स्क्वेअर फुटाचं हक्काचं घर मिळालंच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदी-शाह मुंबईला अदानी सिटी करणार
धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर तिचं वेगळेपण आहे. तिथे एक इंडस्ट्रियल इस्टेट आहे. तिथे प्रत्येक घरात मायक्रोस्केल उद्योग चालतो. त्यात कुंभार आहेत, चामडे उद्योग आहे. याच वेळी अदानीला धारावीचं टेंडर द्यायचा डाव आम्ही उधळून देणार आहोत. मोदी-शाह मुंबईला अदानी सिटी करणार आहेत. उद्या कदाचित मुंबईचं नावही बदलून अदानी सिटी करतील, पण आम्ही धारावीवासियांना उद्ध्वस्त करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. हे मुंबईला भिकेला लावण्याचं कारस्थान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अदानींना वारेमाप एफएसआय दिला जातोय. धारावीचा ५९० एकरचा भूखंड आहे, त्यात ३०० एकरवर घरं- गृहनिर्माण विभाग आहे. बाकी माहिम नेचर पार्क, टाटा पॉवर स्टेशन आहे. अदानीला दिलेल्या टेंडरमध्ये वाढीव एफएसआयचा उल्लेख नाही. आता तिथे सर्व घरांना नंबर देत आहेत, म्हणजे पात्र अपात्रतेच्या निकषात अडकवून घरं रिकामी करायची, धारावीकरांना हाकलून लावायचं, धारावी रिकामी झाली की ती अदानीच्या घशात घालून भूखंडाचं श्रीखंड ओरपायचं, नागरी संतुलन बिघडवण्याचं काम सुरु आहे, हे टेंडर रद्द करा, पुन्हा पारदर्शक पद्धतीने टेंडर काढा आणि योग्य माणसाला द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.