महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा धुळ्यात पार पडणार आहे. आज दुपारी 12 वाजता ते धुळ्यात जनतेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांसाठी चार दिवसांत नऊ प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. तसेच एक रोड शोदेखील मोदी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांच्याही सभा होणार आहेत.
असे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचे संपूर्ण वेळापत्रक
भाजपने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा कार्यक्रम निश्चित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा आज दुपारी 12 वाजता धुळ्यात पार पडेल. त्यानंतर दुपारी दोन वाजता नाशिक येथील सभेला पंतप्रधान संबोधित करतील. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित असतील.
यानंतर शनिवारी 9 नोव्हेंबरला अकोला आणि नांदेड या ठिकाणी मोदींची सभा होईल. मंगळवारी, 12 नोव्हेंबर पुण्यात रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी मोदी हे चिमूर आणि सोलापुरात सभा घेतील. यानंतर गुरुवार, 14 नोव्हेंबर रोजी संभाजीनगर, रायगड आणि मुंबईतील प्रचारसभांना नरेंद्र मोदी संबोधित करतील.