संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच चित्र स्पष्ट झालं आहे. पुढच्या चार वर्षांसाठी डोनाल्ड ट्रम्प सत्ता संभाळणार आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार, माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही लढत अत्यंत चुरशीची झाली.
अमेरिकन निवडणुकीमध्ये अध्यक्षीय मतदारांची संख्या ही 538 आहे. विजयासाठी उमेदवाराला 270 चे मॅजिक फिगर गाठावे लागते. रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना 277 अध्यक्षीय मते मिळाली तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार, माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना 226 मतांवर समाधान मानवे लागले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प हेडक्वार्टर्स येथे अध्यक्षीय भाषण करून अमेरिकन जनतेचे तसेच आपल्या संपूर्ण टीम आणि कुटुंबियांचे आभार मानले. ट्रम्प यांनी जे.डी वॅन्स यांची उपराष्ट्राध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे.
अमेरिकेत होणाऱ्या या अध्यक्षीय निवडणुकीची भारतातही जोरदार चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले होते. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री अनेक प्रसंगी जगजाहीर झाली आहे. भारतीयांकडून ट्रम्प यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.