महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. पण राज्यातील अनेक मतदान केंद्रावरीलईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मतदान केंद्रावर मतदानाचा हक्का बजावण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पण काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झाल्यामुळे नागरिकांच्या मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागत आहे.
अकोला
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बी. आर हायस्कूलमधल्या बूथ क्रमांक १६९ मधील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. सकाळी मतदान सुरू झाल्यापासूनच मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. या मतदान केंद्रावरील मतदान अद्याप सुरू झाले नाही. मतदान केंद्रावर मतदार ताटकळल उभे आहेत. दरम्यान, अकोल्यात विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली.
संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील २२६ केंद्रावरील ईव्हीएम मशीन गेल्या एका तासापासून बंद पडले आहे. प्रशासनाकडून मशीन बदलण्याचे काम सुरू आहे. नागरिकांची मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लागली आहे. मतदान करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे मतदार वैतागले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विक्रम हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदार केंद्राबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे.
पुणे
पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. अण्णासाहेब पाटील शाळेतील ईव्हीएम गेल्या एका तासापासून बंद आहे. तांत्रिक अडचणींमुळे ईव्हीएम मशीन बंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई
शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघातील आर एम भट शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. ईव्हीएम क्रमांक ४१ नंबरची मशिन बंद झालीय. तर प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपूरा असल्यामुळे ईव्हीएम मशीन सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.