प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोघांमधील ही पहिली भेट ठरली असून. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
आज सकाळी गौतम अदानी हे फडणवीसांची भेट घेण्यासाठी फडणवीसांचं निवासस्थान असलेल्या 'सागर' बंगल्यावर पोहचले होते. भेटीनंतर अदानी आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमानुसार पुढे जाण्यासाठी 'सागर' बंगल्यावरुन रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान अदानींनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे. दोघांमध्ये या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.
मात्र एकीकडे विरोधक सातत्याने अदानी आणि अंबानींच्या नावाने सरकारला लक्ष्य करत असतानाच दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट अदानी त्यांच्या सरकारी बंगल्यावर पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.