अमेरिकेत गर्दीत ट्रक घुसवून दहशतवादी हल्ला ; १५ जणांचा मृत्यू ; नेमकं प्रकरण काय ?
अमेरिकेत गर्दीत ट्रक घुसवून दहशतवादी हल्ला ; १५ जणांचा मृत्यू ; नेमकं प्रकरण काय ?
img
Dipali Ghadwaje
अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे .  न्यू ऑर्लिन्स शहरात बुधवारी पहाटे शमसुद्दीन जब्बार नावाच्या हल्लेखोराने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या जमावाला ट्रकने चिरडले , ज्यामध्ये आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांनी पोलीस आणि तिथल्या लोकांवर गोळ्याही झाडल्या. 

यानंतर पोलिसांनी त्याला ठार केले. एफबीआय या घटनेची दहशतवादी घटना म्हणून चौकशी करत आहेत. जास्तीत जास्त लोकांना ट्रकने चिरडायचे होते. लोकांना मारण्याचा आणि इजा करण्याचा त्याचा हेतू होता, असं पोलिसांनी सांगितले.

नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्सच्या फ्रेंच क्वार्टरमध्ये बोर्बन स्ट्रीटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ३० जण जखमी झाले आहेत. 

शमसुद्दीन जब्बार हा अमेरिकन नागरिक असून त्याने दीर्घकाळ लष्करात सेवा बजावली होती. यामागे इसिसचा हात असू शकतो, असे एफबीआयला वाटते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे.

४२ वर्षीय शमसुद्दीन जब्बारने ज्या ट्रकने जमावाला चिरडले, त्या ट्रकला इसिस या दहशतवादी संघटनेचा झेंडा लावलेला होता. या घटनेत जब्बारसोबत अनेक लोक होते, त्यामुळे आम्हाला जनतेच्या मदतीची गरज आहे. गेल्या ७२ तासांत शमसुद्दीन जब्बार यांच्याशी कोणी बोलले आहे का, याची आम्ही चौकशी करत आहोत, असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, बोर्बन स्ट्रीट दहशतवादी हल्ल्याशी संबंधित हल्लेखोराच्या भाड्याच्या घरात बॉम्ब बनवण्याचे साहित्य सापडले. जब्बारने जमावात घुसलेल्या ट्रकचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ३ पुरुष आणि १ महिला वाहनात आईईडी टाकत आहेत. याशिवाय ट्रकवर इसिसचा झेंडा सापडल्यानेही तो या संघटनेशी संबंधित असल्याचे म्हटलं जात आहे. 

एफबीआयच्या म्हणण्यानुसार, जब्बार मुळचा टेक्सासमधला आहे. जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमधून बॅचलरची पदवी पूर्ण केल्यानंतर, त्याने बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केले. येथे तो बिझनेस डेव्हलपर आणि डेटा इंजिनीअर म्हणून काम करत होता. जिथे त्यांचा वार्षिक पगार १,२०,००० डॉलर्स म्हणजेच सुमारे एक कोटी रुपये होता. त्यांनी यूएस आर्मीमध्ये एक १० वर्षे एचआर स्पेशालिस्ट आणि आयटी स्पेशालिस्ट म्हणून काम केले होते.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून लांब पल्ल्याची बंदूक जप्त केली. हल्ल्याच्या वेळी हल्लेखोराने अंगावर जॅकेट घातले होते. हल्ल्यासाठी वापरलेला ट्रक भाड्याने घेतला होता. ट्रकमध्ये एआर स्टाईल रायफल, पिस्तूल आणि काही बॉम्ब सापडले आहेत. तपास करणाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना घटनास्थळी एक आयईडी सापडला, ज्याचा स्फोट झाला नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group