अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ संपूर्ण कॅम्पस लॉकडाऊन करत आपत्कालीन सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , १७ एप्रिल रोजी, गुरुवारी सकाळच्या सुमारास स्टुडंट युनियन जवळ एक बंदूकधारी शिरल्याची माहिती मिळाली. यानंतर काही क्षणातच गोळीबार सुरू झाला.
पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ प्रतिसाद दिला, तर रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आणीबाणी सेवा तातडीने दाखल झाल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मृत व्यक्ती विद्यार्थी नव्हते
पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये विद्यापीठाचे विद्यार्थी नव्हते. सध्या एक संशयित आरोपी अटकेत असून, त्याच्याविरोधात अधिक तपास सुरू आहे. गोळीबारामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, तपास यंत्रणांनी सर्व दिशांनी चौकशी सुरू केली आहे.
विद्यापीठाने घेतली तात्काळ खबरदारी
घटनेची माहिती मिळताच विद्यापीठ प्रशासनाने तातडीने संपूर्ण कॅम्पस लॉकडाऊन केला. विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आपल्या स्थानावरच सुरक्षित राहण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यापीठाच्या आपत्कालीन अलर्टमध्ये लिहिले होते की, “सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करा, आणि त्यांच्या जवळ जाऊ नका.” नंतरच्या अलर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, “पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही व्यक्ती बाहेर जाऊ नये.” विद्यापीठात सध्या ४२,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे घटना अधिक गंभीर बनली होती.
वर्ग आणि कार्यक्रम रद्द
विद्यापीठ प्रशासनाने सर्व वर्ग आणि कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. कॅम्पसाबाहेर असलेल्या व्यक्तींना त्याठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ९११ किंवा FSU पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर पुन्हा एकदा अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शाळा-कॉलेजांमधील वाढत्या गोळीबाराच्या घटनांनी पालकांमध्ये आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
गंभीर चिंतेचा इशारा
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत घडलेली ही घटना शिक्षणसंस्थांमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंतेचा इशारा ठरली आहे. प्रशासन, पोलिस आणि राजकीय नेतृत्वाने तात्काळ प्रतिसाद दिला असला तरी, या घटनांचे मुळ शोधून कठोर उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. सध्या संपूर्ण कॅम्पसमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे, आणि तपास यंत्रणा गोळीबाराच्या मूळ कारणांचा शोध घेत आहेत.